Numbers 35

लेव्यांची शहरे

1परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबामधील यार्देनाच्या खोऱ्यात यरीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला, 2इस्राएल लोकांना सांग की, त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकांना द्यावी. इस्राएल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांना द्यावी.

3लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत. 4आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी.

5नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तरे बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे.

6त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या माणसाने चुकून कुणाला मारले तर तो माणूस संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी बेचाळीस नगरे तुम्ही लेवीना द्या. 7म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवीना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवीना द्या.

8इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.

शरणपुरे

9नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 10इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल. 11तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो.

12आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या माणसाचा कोर्टात न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो. 13अशी सहा संरक्षक शहरे असतील.

14यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या. 15ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.

16जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे. 17आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मरण पावले पाहिजे. पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे. 18आणि जर एखादा माणूस कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो माणूस सुद्धा मेला पाहीजे. हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.

19मरण पावलेल्या माणसाच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्याला ठार मारू शकतो. 20माणूस एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्याला ठार करु शकतो. 21जर कोणी ते हेतूपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या माणसाला ठार मारलेच पाहिजे. मरण पावलेल्या माणसाच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्याला मारु शकतो.

22एखादा माणूस अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मरण पावलेल्या माणसाचा त्याने द्वेष केला नाही त्याला त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही. 23किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला न दिसलेल्या माणसाला लागला व तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मरण पावलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.

24जर असे घडले तर काय करायचे ते समाजाने ठरवायचे. मरण पावलेल्या माणसाच्या कुटुंबातील एखादा माणूस त्याला मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे. 25जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर समाजाने खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे.

26त्या माणसाने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या 27आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत माणसाच्या कुटुंबाने त्याला पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो माणूस खुनाचा अपराधी ठरणार नाही. 28एखाद्या माणसाने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो माणूस त्याच्या स्वत:च्या प्रदेशात जाऊ शकतो.

साक्षीदार आणि प्राणबद्दल खंडणी ह्यांविषयी नियम

29तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील. 30मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.

31जर एखाद्या माणसावर खुनाचा दोष असेल तर त्याला मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका. त्या खुन्याला मारलेच पाहिजे. 32जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.

33ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही. मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.

34

Copyright information for MarULB